Goshticha Guruvar | गोष्टींचा गुरूवार | भाग १ ला

गोष्टींचा गुरूवार या उपक्रमात प्रत्येक गुरूवारी आपणास एक गोष्ट दिली जाणार आहे. ती गोष्ट आपण ऐकू शकता. तीच गोष्ट आपण खालिल दिली असेल त्याचे वाचन सुध्दा करू शकता. प्रथम श्रवण करा नंतर ती वाचन करा. यामुळे वाचन कसे करावे हे तुम्ही शिकाल. त्यानंतर त्याचप्रमाणे वाचन करून वाचनाचा व श्रवणाचा सराव करू शकाल.

Gosthicha-Guruvar-Bhag-1-गोष्टींचा-गुरूवार-भाग-१ला-आमची-शिल्लक

आमची शिल्लक

- लेखिका- लक्ष्मीबाई टिळक

 


खाली दिलेल्या प्ले च्या बटणवर क्लिक करून प्रथम गोष्ट ऐका. तीच गोष्ट ऐकल्यानंतर ती वाचन करा. आशा करतो आपणास ती नक्की आवडेल.

Gosthicha-Guruvar-Bhag-1-गोष्टींचा-गुरूवार-भाग-१ला-आमची-शिल्लक




Listen to the the audio file



एक दिवस पाऊस पडत होता. दत्तू व हौशी आपापल्या शाळांना गेली होती. टिळक शिकवायला गेले होते. घरी मी एकटीच होते. दाराशीच काही निवडीत बसले होते. तो दाराशी एक मुलगी भीक मागायला आली. तिचा नुसता हाडांचा सापळा राहिला होता. मुलीचे डोके पाटीएवढे, अंगात काही त्राण उरलेला नाही. डोळ्यांत प्राण आलेला आहे. अंगावर एक जीर्ण फाटके असे लज्जारक्षणापुरते हातभर कापड, हातात टिनपाट, अशी येऊन ती दारात पावसात उभी राहिली. तिच्या तोंडावर डाग दिल्याचे ताजे वण दिसत होते. प्रथम मी तिला घरात घेतले व तिची विचारपूस करू लागले. "तुला भीक मागायला आवडतं का घरात राहायला आवडतं ?".

" भीक मागायला. "

“तू माझ्याजवळ राहतेस का ? "

"हो."

"तुला कोणकोण आहे !"

“कोणी नाहीत. सर्वांनी मला सोडून दिलं आहे. माझं गावही फार लांब आहे. " अशा तऱ्हेने बोलणे चालणे झाल्यावर मी आपल्या मनाशी तिला ठेवून घेण्याचे ठरवले. तिला न्हाऊ घातले व हौशीचे एक लुगडे नेसायला दिले. पण एवढ्यानेच तिचे स्वरूप किती पालटले !

संध्याकाळी मुले व टिळक घरी आल्यावर ही मुलगी पाहून त्यांना कुतूहल वाटले. सगळे सारखेच आहेत.

"हे काय आहे?

"हे दुष्काळाचं चित्र आहे. मी हिला घेतली. "

"कशाला! आपल्याला हौशी आहे, देवानं ही तारा दिली, आणखी....." "आणखीही 'दया' दिली. मला हिची दया आली व देवानंही हिच्यावर दया केली."

"बरं, काही हरकत नाही. "

तिचे नाव दया ठेवले.

थोडयाच वेळाने शेजारपाजारच्या कित्येक खिरस्ती बाया आमच्याकडे आल्या.

"अहो साहेब, ही मुलगी कोणाची आहे, ठाऊक आहे का ?"

“नाही! का ?"

“अहो, ही मांगाची आहे ना ! "

"मग ?

"तुम्हांला काही नाही वाटत त्याचं !"

“काही नाही. का? आम्हांला मांग, महार, ब्राम्हण वगैरे सारखेच आहेत."

 

" तुम्ही आमच्याही पुढे गेलात. आम्हांला नाही चालायचं हे." असे म्हणून त्या वाया गेल्या व पुढे कित्येक दिवस त्यांनी आमचे घर वर्ज्य केले !

टिळकांनी मात्र यापुढे घरात महार, मांग वगैरे सर्व जातींचे कामगार ठेवण्यास सुरुवात केली. दया आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक पोक्त वयाची मांगीण टिळकांशी भांडायला आली. दया भीक मागत मागत ह्या म्हातारीकडे गेली होती. म्हातारीने तिला आसरा दिला. दया भीक मागून आणायची. म्हातारी तिला घरात राहू दयायची व दोघींचे पोट दयेच्या भिकेवर चालायचे.

“ तिला तुमच्या घरी येऊन किती दिवस झाले ! "

" आठ दिवस. "

“तेवढ्यावर तिजवर मालकी हक्क स्थापन करतेस काय ? अन् हे डाग कुणी दिले तिच्या गालांवर!"

"मला ठाऊक नाही. " “खोटं बोलतेस थेरडे ? डाग दोन-तीन दिवसांचे दिसतात. खरं सांग, नाहीतर तुला पाठवतो तुरुंगात खडी फोडायला."

हो ना करता करता ती कबूल झाली, की पोरगी भरपूर भीक आणीना, तेव्हा तिच्या गालाला उलिसंक कोलीत लावलं. मग मात्र टिळक फारच संतापले व म्हातारी पळून गेली. पुन्हा तिने कधी तोंड दाखवले नाही.

 

दोन्ही मुली शाळेत जाऊ लागल्या. दोघींनाही एकाच वर्गात घातले. हत्या मराठी तिसरीत गेल्या. आम्हांला हया मुलींकडून काडीचाही त्रास झाला नाही. त्यांनी चोरी, लबाडी वगैरे कधीच काही केले नाही. घरात अगदी घरच्यासारख्या त्या वागत. शेण लावणे, खरकटे हात धुणे वगैरे गोष्टी न सांगता शिकल्या. चटण्या, कोशिंबिरी,पापड, लोणची त्यांना करता येऊ लागली. स्वैपाकातसुद्धा त्या हुशार झाल्या. पुढे पुढे दुष्काळाचे स्वरूप फारच उम्र भासू लागले. त्यातच मिशनला काही तूट आली, का काही झाले; पण त्यांनी बोर्डिंगमधून काही मुले काढून टाकली. गावात जिकडे तिकडे खळबळ उडाली. मुलांना कुठेच काही आधार नव्हता. सुगंधराव करमरकरांनी टिळकांना ही बातमी येऊन सांगितली. टिळकांना आधी हयाबद्दल काही माहिती नव्हती. ही बातमी ऐकून टिळकांना फारच वाईट वाटले. ते मजकडे आले व म्हणाले, "अशीच बावीस मुलं मिशननं एकाएकी आपल्या शाळेतून काढून टाकली आहेत. ती अन्नान्न करून मरतील. आता काय करायचं !"

त्या दिवशी आमच्याजवळ शिल्लक सव्वा रुपया व घरात साठवणीत सव्वाशेर ज्वारी होती. पण आमची मोठ्यात मोठी शिल्लक म्हणजे देवावरचा विश्वास. ती मात्र अगदी भरपूर होती. आम्ही दोघांनी जमिनीवर आपली मस्तके ठेवून मनोभावे परमे- श्वराची प्रार्थना केली. नंतर दोघांनी एकमेकांना वचन दिले, की आपले अन्न व हवा मुलांचे अन्न हयांत काहीच फरक करावयाचा नाही. जी काय ज्वारी-बाजरीची भाकरी मुलांना मिळेल तीच आपणही खायची !

दत्तू ला आम्ही आमच्याजवळ बोलावून घेतला. त्याला सांगितले, “बाळ, पाहा, तुझे भाऊ आज उपाशी रानावनात फिरत आहेत. आम्ही त्यांना आपल्या घरी आणणार आहो. ते जे खातील ते तुला खावं लागेल. खाशील ना !" दत्तू म्हणाला, “हो, मी त्यांच्याबरोबरच जेवीन, खाईन. भांडणार नाही. "

आणि पुढे मुले आणल्यावर ती जाईपर्यंत ती खात तेच अन्न दत्तूने खाल्ले न आपले वचन पाळले.


वाचन- निलम विनायक गायकवाड

शाळा - मनपा शाळा क्र.२०२

मुलांची, वडगावशेरी पुणे -१४