गोष्टींचा गुरूवार या उपक्रमात प्रत्येक गुरूवारी आपणास एक गोष्ट दिली जाणार आहे. ती गोष्ट आपण ऐकू शकता. तीच गोष्ट आपण खालिल दिली असेल त्याचे वाचन सुध्दा करू शकता. प्रथम श्रवण करा नंतर ती वाचन करा. यामुळे वाचन कसे करावे हे तुम्ही शिकाल. त्यानंतर त्याचप्रमाणे वाचन करून वाचनाचा व श्रवणाचा सराव करू शकाल.
आई
लेखक-उद्धव ज. शेळके
उद्धव ज. शेळके (जन्म १९३१) ते कथाकार व कादंबरीकार आहेत. त्यांची 'धग', 'वानगी', 'शिळान अधिक आठ कथा' ही व इतर अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. पुढील कथा त्यांच्या शिळा अधिक आठ कथा' या कथासंग्रहातून घेतली आहे. या कथेत त्यांनी आईच्या मायेचे चित्र रेखाटले आहे.
खाली दिलेल्या प्ले च्या बटणवर क्लिक करून प्रथम गोष्ट ऐका. तीच गोष्ट ऐकल्यानंतर ती वाचन करा. आशा करतो आपणास ती नक्की आवडेल.
खालिल प्ले बटणवर क्लिक करून कथा ऐका.
आईला शेतात जायचे होते. त्या घाईने ती थंडया पाण्याच्या भाकरी करत होती. पिठाचा उंडा मळताना एकीकडे मला हलकेच म्हणत होती, 'काशा, तुला तर आज सुटीच असेल, नाही रे!"
"हो, का?"
“तर मग आजचा दिवस माझ्याबरोबर चलतो काय?"
आईचा उद्देश मला बोचला. नकळत माझ्या सुरात तो डोकावला "कुठे ग " “मी म्हणत होते की- " आई मुद्दाम माझ्याकडे न बघता तव्यावरची भाकरी कोरताना म्हणाली, "माझ्याबरोबर निंदायला चलशील तर बरं होईल. एखादी पाथगीत घेऊ लागशील. तितकाच तेला-मिठाला आधार होईल."
आईचे संपायच्या आतच मी बोललो, “पण मला निंदता येत नाही ना ग "
“निदाता काय वेदमंत्र लागतात रे मी सांगेन तुला कसं निंदायचं ते!"
" माझ्याकडून होईल ?"
" जेवढी होईल तेवढीच तू निंद. उरलीच तर मी घेऊ लागेन. झालं आता !" मीही बोललो, “पण मला अभ्यास करायचा आहे ना ग !"
"अस्सं ?" आता आईनं एकदम माझ्याकडे डोळे फिरवले. सूर ताणून विचारले, "प्रत्येक सुट्टीच्या दिवशी, तू अभ्यासच करत असतोस, नाही रे ?"
“आतापर्यंत नाही केला; पण आजपासून करत जाईन. मास्तर म्हणाले, की आता परीक्षा जवळ आली. जो अभ्यास करणार नाही, तो नापास होईल-" माझं संपायच्या आत हातावरची भाकर तव्यावर आपटताना ती म्हणाली, "मला चतुराई शिकवतो काय रे? अजून मी बोळ्यानं दूध पीत नाही समजला!" मी जीव तोडून म्हणालो, “जा. तुला खोटंच वाटतं नेहमी सगळं !"
माझे न ऐकता ती लगेच एकेरीवर येऊन पुटपुटू लागली, "चल, माझ्याशी एक अक्षर बोलू नको! आता पाहते ना तुझी मजाच मग समजेल, आजपासून कुठं खाशील ते!"
हे सुरू असताना माझ्या पुढ्यात त्या दिवसाचे भवितव्य नाचू लागले. मी वेळीच सावरते घेतले, “बरं, येईन आजच्या दिवस !"
पण वेळ निघून गेलेली होती. आई एकदम म्हणाली, "काही नको येऊ-विऊ. माझ्यावर फालतूच उपकार कशाला करतो ?" यावर मीही ताठरलो. माझ्या ओठात राग थरथरू लागला, पण बाहेर डोकावण्याचे धाडस त्याच्यात नव्हते.
आईही बेपर्वा राहिली. घाईघाईनं दीड भाकर, वरणाचा पेंड व अघळपघळ चटणी घेऊन तिने लुगडयाच्या पदरात शिदोरी बांधली. सुभद्रेची भाकर तिच्या सुपूर्त करून ती सरस्वतीकडे ठेवायला सांगितली. उरलेल्या भाकरी दुरडीत एकावर एक रचून ठेवल्या. आईला दुरडीवर झाकण ठेवताना पाहून सुभद्रा माझ्या खुणावण्यानं म्हणाली, “आई, काशाला काही खायचं ठेवलं नाही काय ?"
"गप्प बैस ना, नाही तर तुलाही ठेवीन तशीच कडावर ! "
यावर सुभदा भांबावल्यागत झाली. आळीपाळीने आईकडे अन् माझ्याकडे नुसती पाहात राहिली. आई काही बोलली नाही. एका हाती शिदोरी व दुसऱ्या हातात कुलूप घेऊन बाहेर पडताना ती मला म्हणाली, "हं, चला रावसाहेब, निघा बाहेर. "
मीही मुकाटयाने बाहेर पडलो. तिने कुलूप घेतलं. सुभद्रेने आपली भाकर घेऊन सरस्वतीच्या घराची वाट धरली. दाराच्या नाकात कुलपाची नथ अडकवून झाल्यावर आईने माझ्याकडे पाहात, निर्वाणीने विचारले, “मग, नाही चलत ना निंदायला !" यावर का कुणास माहीत, आई नरमली अन् त्या भरवशावर मी ताठरू लागलो. मला बोलायला उशीर झाला आणि तिथेच माझी भयंकर चूक झाली. कारण पुढच्याच क्षणी आई धमकीने म्हणाली, "असं आहे तर मग ! नाही ?" आणि ती शेताच्या वाटेने चालू लागली. पाहता पाहता वाऱ्यासारखी दिसेनाशी झाली. माझ्या बुबुळांवर अश्रूंचा तगर तरंगला. भान विसरून मी आईची कोरी बाट न्याहाळत राहिलो. बराच वेळ गेला. हे बघत असलेल्या सुभद्रेचा चेहरा केविलवाणा झाला. ती मला म्हणाली, "काशा, आईनं तुझ्यासाठी जेवायला नाही ठेवलं काय रे ? " मी चिडून म्हणालो, “न ठेवू दे नाही ठेवलं तर !"
जरा वेळाने सुभद्रेला भूक लागली. मी मनातून याचीच वाट पाहात होतो. आपली भाकर खाताना सुभद्रा मला म्हणाली, “काशा, येरे आपण जेऊ !" "भाकर तर थोडीशीच आहे, " मी उगीचच म्हणालो.
"असू दे. अर्धी अर्धी वाटून खाऊ
"नाही बा."
"का रे !"
“तू आईला सांगशील, पोट्टे ! "
"नाही सांगत. "
"खरंच?"
"हो," " ती समजदारासारखी माझ्या कंठमण्यावर हात ठेवून म्हणाली, "तुझ्या गळ्याची शपथ !" नंतर मी तिच्या शिदोरीत सामील झालो. वयाप्रमाणे सुभद्रेच्या जेवणापेक्षा माझ्या जेवणाचा वेग जास्त होता. त्याचा फायदा घेऊन मी बकाबका भाकर खाल्ली. सुभद्रेची हळुवार रवंथ संपली. दोघांनीही हात ओलवले.
मी सदऱ्याच्या बाहीने तोंड कोरडवत कोरडवत शाळासोबत्यांच्या घराचा रस्ता घरला. सापडेल त्याच्या घरात शिरून दिवस कलेपर्यंत खेळत बसलो. दिवस कलण्यापूर्वीच माझे लक्ष खेळावरून उडाले. भुकेच्या नावाने पोट कुतकुत करत होते. खेळात लक्ष लागत नव्हते. आरोळया-जांभया सतत चालू होत्या. मी एकीकडे कलतीकडे झुकणाऱ्या सूर्याच्या गोळ्याकडे बघत होतो व दुसरीकडे केवळ वेळ काढावा म्हणून सोबत्यांशी बोलत होतो. पण अखेर मी खेळ टाकून घराची वाट धरली. घरी आलो, त्या वेळी सुभद्रा उंबऱ्यात डोके ठेवून माझी वाट बघत असलेली दिसली. तिचाही चेहरा उतरलेला अन् डोळ्यांत पाणी तरारत होते. मला पाहताच ती म्हणाली,
"काशा, मला भूक लागली रे !” "मग, मी काय करू ?"
“कुलूप उघड. आपण दोघं बहीण-भावंडं जेवू!" "माझ्याजवळ किल्ली नाही."
"मग माझ्या भाकरीतली भाकर का खाल्ली रे, तू ?" ती एकदम रडकुंडीस आली. नाकातून सूर काढत तालावर बोलल्यासारखी म्हणाली, "ते काही नाही काशा, मला भूक लागली. मला जेऊ दे, नाहीतर मी आईला सांगते. हो"
असे ती अगदी पहिल्यांदा म्हणाली तेव्हा मी आईच्या धाकाने घावरूनच गेलो; पण नंतर आता बिनधोकपणे म्हणालो, “जा. सांग - "
यावर भुकेपेक्षा मी केलेल्या अपमानाने ती चिडली. भोकाड पसरले. 'मी आईला सांगते, मी आईला सांगते,' असे टुमणे आळवले अन् मग झोपी गेली.
ती झोपेच्या स्वाधीन होऊन आपले भुकेचे दुःख विसरून गेली. पण माझ्या जाणत्या शरीराला ते जमले नाही. मला ते सतत टोचत राहिले. आईच्या म्हणण्या- प्रमाणे मी ऐकले असते तर बरे झाले असते, असे मला वारंवार वाटू लागले.
तेवढ्यातच आई घरी आली. तिला लांबून बघून मी सुभद्रेला जागे केले. ती उठली आणि घराकडे येणाऱ्या आईच्या वाटेवर गेली. पण आई एकदम घरी आली नाही, पहिल्यांदा तिने सरस्वतीच्या ओसरीत बस्तान ठोकले. माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे भासवले. चुकून दृष्टादृष्ट झालीच तर आईचे डोळे मोठे होत; ते पाहून माझी छाती धसकली. तरी मनाचा हिय्या करून मी तिच्या दिशेने गेलो. माझी चाहूल घेऊन तिचा चेहरा खूप कडवट झाला. वेळ प्रसंगी माझ्याकडे पाठही केली गेली. पण बोलली काही नाही अन् म्हणून मी तिथे उभा राहू शकलो.
बसल्या बसल्या सरस्वती आणि आई यांच्यामध्ये शेतजमिनीतल्या गप्पांसोबत पान- खांडाची देवाण-घेवाणही सुरू झाली. आईने कमरेची पिशवी काढली. पण कधी चुना तर कधी तंबाखू खुंटला. आता काय खुंटल्याचे पाहताच आई सरस्वतीला म्हणाली, "काथ तर नाही ग आता."
तसा मी धूर्तपणा साधून म्हणालो, "मी आणतो. " “काही नाही आणाबिणाचा." असे बोलून आई अतिशय कठोर स्वरात म्हणाली, " आणता येतो मला.
हे ऐकून आम्हा दोघांत पडलेल्या अंतरात टाका मारण्याचा माझा प्रयत्न फुकट गेल्याचे दुःख मला फार जाणवले. तेवढ्यात माझी बाजू घेऊन म्हणा किंवा सहज म्हणा - सरस्वती आईला म्हणाली, “तो आणतो म्हणतो, तर का आणू देत नाही ग, त्याला ? "
यावर आईने अंग हिसडले. नाक मुरडल्यासारखे केले. तेव्हा सरस्वतीने विचारले 'का, झालं तरी काय ?" “ मला त्या मुदबक्याविषयी तू बोलायला नको लावूस, बिचारे !”
नंतर आई स्वतः आमच्या घरात गेली. काथ आणला. दोघींचे पान खाणे झाले. थोडया वेळात आई घरात आली. आपली कामे करू लागली. ती पाण्याच्या घागरी घेऊन विहिरीवर गेल्याची संधी साधून मी चिमणीत तेल ओतले. आगपेटी घेऊन चिमणी लावायला बसलो. तितक्यात एक डोक्यावर अन् दोन घागरी हातांत घेऊन येत असलेली आई माझ्यावर खेकसली, “ठेव ! ठेव ती चिमणी अन् आगपेटी ! तुला कुणी सांगितल्या या म्हालपंचायती करायला, अं”
तरीही आईचे हात रिकामे नसल्याचे पाहून मी माझे काम सुरूच ठेवले. पण आईने लगेच होत्या जागी घागरी पंटकल्या अन तरातरा चालत माझ्याजवळ आली.
माझ्या हातातली चिमणी व आगपेटी हिसकताना म्हणाली, "खबरदार, कधी माझ्या कोणत्याच कामाला हात लावशील तर-
आणि तिने स्वतःच दिवा लावला.
यानंतर मीही आईच्या कोणत्याही कामात मदत करण्याचे सोडून दिले. ती सारे काही एकटीच करत होती. कोणते हलके-सलके व सुभद्रेला जमण्यासारखे काम असले तर तिच्याकडून ते करवून घेत होती. तिला सांगितलेल्या कामात माझी लुडबूड तिला खपत नव्हती. असेच आणखी दोनदा माझ्या वाटयाला आल्यावर आता मीही थोडा अकडलोच. खरोखर काहीएक न करता खोलीतल्या एखादया वस्तूसारखा एका कोपऱ्यात बसून मुकाट्याने सारे पाहू-न्याहळू लागलो.
आईची सारी कामे आटोपली म्हणजे आई जेवायला बसत असे. तशी ती आताही बसणार होती. शिक्यातले सारे काही ताटात वाढून घेतल्यावर सुभद्रेला जवळ बसवले. वरणा-डाळीचा काला केला. त्याचा एक भला थोरला घास घेतला. त्या वेळी न राहवून तिचे लक्ष माझ्यावर गेलेच. तशी उठून म्हणाली, "चल, ऊठ तिथून. माझ्या खायच्या वेळेस असा ताटापाशी खिळून नको बसू ! "
हे ऐकून मला पुरते भडभडून आले; पण इलाज नव्हता. त्यामुळे पाय आपटत अन् नाक फुरफुरबत मी घरातून ओसरीत आलो. ओसरीत अंधार मावत नव्हता. मी बसलो त्या जागेहून मला सुभद्रा व आई पूर्णपणे दिसत होत्या. मी मात्र त्यांना अजिबात दिसत नव्हतो. दिसू नये असाही माझा हेतू होताच.
आईने चारसहा घास घेतले. पाणी प्यायली. तोंडचा पेला काढला. लुगडयाचा पदर डोळयाला लावला. डोळे कोरडवत पण हलकेच सुभद्रेला म्हणाली, "पोट्टे, जा, तो बेइमान आहे का पाहा बरं ओसरीत. "
हे ऐकून सुभद्रा तिथे येण्यापूर्वी मी सटकलो. ओसरीतल्या कुणासही सहजासहजी दिसणार नाही, अशा अगदी दाट अंधारात जाऊन उजेडातल्या आईकडे व सुभद्रेकडे पाहू लागलो. सुभद्रा ओसरीत आली. वरवर पाहिल्यासारखे करून घाईने आईच्या ताटाशी बसताना म्हणाली, “आई, तो तर नाही ग तियं ! " आईचा चावता घास एकदम थांबला. ती म्हणाली, "काय, काशा ओसरीत नाही ?"
'नाही."
"चांगल पाहिले"
" हो ना गं...."
तसा आईचा एक हात चिमणीकडे गेला. ती घेऊन ती उठली. ओसरीत आली. ओसरीचा कोनाकोपरा धुंडाळत असताना तिचे एकदम माझ्यावर लक्ष गेले तशी सुरात रखरखीतपणाची ओढाताण करीत मला म्हणाली, “येनं येनं बेइमाना, तुझी टेक झाली पुरी; पण माझी नाही होत पुरी कधी. मला तर तुमचे पाय धरावेच लागतात. चल, बसतो की नाही ताटावर हात पाय धून?"
भाग १ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी खालिल चित्रावर क्लिक करा
1 Comments
अझीम अफसर मुजावर
ReplyDelete