क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महात्मा फुले यांच्या साथीने केलेले कार्य कालपटावरून कोणीही पुसून काढू शकणारे नाही, असे अद्वितीय क्रांतिकारी आहे. सनातनी वृत्तीच्या समाजाच्या विरोधाला न जुमानता, न डगमगता त्यांनी स्त्रियांना शिकवून समाजात पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळवून दिले, हे त्यांचे समस्त स्त्री जातीवर व मानव जातीवर उपकारच आहेत. ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या अतुलनीय कार्याचे स्मरण.

savitribai-phule-mahiti-marathi


सावित्रीबाई जोतीराव फुले माहिती 

टोपणनाव:

ज्ञानज्योती, क्रांतिज्योती

जन्म:

३ जानेवारीइ.स. १८३१
नायगावसातारामहाराष्ट्र

मृत्यू:

मार्च १०इ.स. १८९७
पुणेमहाराष्ट्र

चळवळ:

मुलींची पहिली शाळा सुरू करणे

संघटना:

सत्यशोधक समाज

पुरस्कार:

क्रांतीज्योती

प्रमुख स्मारके:

जन्मभूमी नायगाव

धर्म:

हिंदू

वडील:

खंडोजी नेवसे (पाटील)

आई:

सत्यवती नेवसे

पती:

जोतीराव फुले

अपत्ये:

यशवंत फुले


आभार https://mr.wikipedia.org/

सावित्रीबाईंच्या शैक्षणिक क्रांतीची ज्योत त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षीच प्रज्वलित झाली आणि त्याचवेळी त्यांनी शैक्षणिक कार्याचा श्रीगणेशा केला; त्याची तेजस्विता तर आजही कायम आहे आणि तेवढीच प्रखर आहे. शैक्षणिक, सामाजिक व वाङ्मयीन क्षेत्र त्यांच्या कार्यांनी व्यापून टाकले. सावित्रीबाईंच्या अंगी असलेली सावित्रीबाईंच्या अंगी असलेली जिद्द, कामावरील अतूट निष्ठा यांमुळे झपाटल्यागत त्यांनी कामाला वाहून घेतले. त्यांना महात्मा जोतिबांसारखे मार्गदर्शक सहचर लाभले.

शिक्षिका, पर्यवेक्षिका, मुख्याध्यापिका या तीनही भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. त्या आपल्या कार्याशी समरस होत असत. मुलांची शैक्षणिक प्रगती, त्यांच्या समस्या यासंबंधी त्यांचे सतत चिंतन, मनन चालू असे; म्हणूनच शिक्षण सुरू केल्यापासून अवघ्या ८ ते १० वर्षांच्या काळात शिक्षणावर भाष्य करण्याची पात्रता त्यांच्या अंगी निर्माण झाली. त्यांनी जे शैक्षणिक सिद्धांत मांडले, ते त्यांना त्यावेळच्या परिस्थितीमध्ये जे अनुभव आले; त्या अनुभवांच्या आधारावर मांडले. त्यांचे सिद्धांत युरोपियन देशातील सोळाव्या व सतराव्या शतकांतील शिक्षणतज्ज्ञांच्या सिद्धांतांशी मिळतेजुळते आहेत. याचाच अर्थ शेतामध्ये मातीवर रेघोट्या ओढून अ, , , ई शिकणाऱ्या सावित्रीबाईंनी आपली बुद्धी, चाणाक्षपणा, जिद्द, प्रसंगावधान, समाजाविषयीचा अत्यंतिक कळवळा यांमुळे आपल्या कर्तृत्वाने सर्व क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांनी जे विचारमंथन केले, जे सिद्धांत प्रतिपादित केले, ते सिद्धांत पुढीलप्रमाणे : 

(१) समाजाच्या दुरवस्थेचे मूळ व्यक्तीच्या अज्ञानात :

बहुजन समाजाचे दैन्य, दुरवस्था यांचे मूळ त्यांच्या अज्ञानात आहे. आपला विकास, उत्कर्ष कशात आहे हे त्यांना कळत नाही. शिक्षण हाच त्यावरील एकमेव उपाय आहे; म्हणूनच त्या 'ईशस्तवन' मध्ये म्हणतात :

आम्ही लेकरे तुला प्रार्थितो,

 विदया देई ज्ञान इच्छितो,

दैन्यासूर संहारा । श्रीधरा ।। 

शिक्षण घेण्यासाठी त्या सर्वांना उदयुक्त करतात. त्यासाठी मुले, मुली यांनी कसे तयार व्हावे हेही त्यांनी सांगितले. 'सामुदायिक शिक्षणासाठी जागे व्हा' या काव्यात त्या म्हणतात :

उठा बंधूंनो, अतिशूद्रांनो, जागे होऊनी उठा, परंपरेची गुलामगिरी तोडण्यासाठी उठा, बंधूंनो, शिकण्यासाठी उठा. शूद्र उठले, स्त्रिया उठल्या आणि त्यांनी गुलामगिरी मोडून काढली.

(२) संस्कारातून शिक्षण :

जेव्हा बालक शिक्षण घेते, तेव्हा त्याला संस्कार, अनुभव दिले जातात. हे संस्कार गर्भधारणेपासून सुरू होतात. मातेचा आहार, विचार, संस्कार व पर्यावरण यांचा बालकावर परिणाम होत असतो. हेच विचार युरोपियन देशातील शिक्षणतज्ज्ञ जॉन कोमेनियसने सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला मांडले होते. भारतीय जनतेसमोर ते विचार एकोणिसाव्या शतकात सावित्रीबाईंनी केवळ मांडलेच नाहीत, तर त्या दृष्टीने सर्वप्रथम कार्य केले. संस्कार जीवनात किती महत्त्वाचे असतात, त्यातून पुढील आयुष्य कसे घडते ते केवळ सांगितलेच नाही, तर मुलींवर त्यांनी त्यानुसार संस्कारही केले.

(३) स्त्रीला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणे :

समाजाचे अध: पतन थांबवायचे असेल, तर स्त्रीला प्रथम एक माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हे त्यांनी अचूक ओळखले होते. स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान झाला पाहिजे, म्हणून त्यांनी स्त्री समस्यांचा विचार करून केशवपनास विरोध, विधवा विवाह या संदर्भात सखोल अभ्यास करून तोड काढण्याचा प्रयत्न केला. यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना होय. याद्वारा मानवतेस काळिमा फासणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यात त्या यशस्वी झाल्या. अशा रीतीने त्यांनी आयुष्यभर स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

(४) शिक्षक व विद्यार्थी एकाच परिसरातील आवश्यकः सावित्रीबाईंचे म्हणणे असे होते, की विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे ज्ञान दयायचे असेल, तर शिक्षक व विद्यार्थी दोघेही एकाच परिसरात राहणारे असले पाहिजेत. त्यामुळे त्यांचा परिसर, त्यांना जाणवणाऱ्या समस्या याबरोबरच शिक्षकांना विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती असते. ते त्यांचे मानसशास्त्र नीट समजून घेऊ शकतात,

म्हणून सावित्रीबाईंनी ब्राम्हण मुलींच्या शाळेवर ब्राम्हण शिक्षकाची व शूद्रातिशूद्र मुलींच्या शाळेवर त्या स्वतः व शेख फातिमा यांची नेमणूक केली होती. जेव्हा त्यांची परीक्षा घेतली, तेव्हा त्यांना दोन निष्कर्ष मिळाले. एक म्हणजे विदयार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला परंपरा व पर्यावरण या दोन्ही बाबी कारणीभूत असतात आणि दुसरा म्हणजे विदयार्थी व शिक्षक हे दोघेही एकाच पर्यावरणातील असतील, तर त्यांच्या समस्यांची उकल लवकर होते. 

(५) हसतखेळत शिक्षण दयावे :

कोणत्याही प्रकारचा ताणतणाव येऊ न देता शिक्षण दिले, तर ते लवकर समजते, अधिक काळ स्मरणात राहते. सावित्रीबाईंनासुद्धा हेच अपेक्षित होते. त्या शाळेमध्ये अगदी साध्या सोप्या भाषेतून सांगायच्या. काही वेळ शिकविले, की खेळण्यासाठी सुट्टी दयायच्या.

अलीकडच्या 'आनंददायी शिक्षण प्रकल्पात' विशिष्ट वस्तूंच्या, चिन्हांच्या माध्यमातून मुलांना शिकविण्याचा प्रयत्न आहे; हेच त्यावेळी सावित्रीबाईंना अपेक्षित होते. यावरून त्या द्रष्ट्या विचारवंत होत्या हे लक्षात येते.

(६) शिक्षणात प्रयोगशीलता, कृतिशीलता असावी :

सावित्रीबाईंनी शिक्षण कसे असावे, हे त्यांच्या एका पदयामध्ये सांगितले आहे.

नकोच इच्छा आरामाची,

ईर्षा धरुनि शिक्षणाची,

संधी घ्या तुम्ही छान आजची,

अनुकूलता बघा कालगतीची.

न कुरकुरता, न आळसता शाळेत जाऊ, शिकू चला.

गुलामगिरीची युगायुगीची बेडी तोडू चला चला 

सनातनी लोकांकडून केली जाणारी अडवणूक संपविण्यासाठी व कृतिशील होण्यासाठी शिक्षण घ्यावे, आळस करू नये हे नुसते सांगितले नाही, तर तशी संधीही त्यांनी उपलब्ध करून दिली.

(७) चारित्र्यसंपन्न, नीतिमान मुले निर्माण करणे :

आपला समाज हा अविकसित आहे; कारण तो अज्ञानी आहे. त्याचे हित कशात आहे, हे त्याला समजत नाही. आपल्यावर लादलेली गुलामगिरीही त्यांना समजत नाही. याचे कारण सांगताना सावित्रीबाई 'शूद्राचे परावलंबन' या कवितेत म्हणतात :

ज्ञानाचे नसती डोळे । म्हणोनि न दिसे दुःख स्वावलंबी नसे शुद्र / स्वीकारती पशु सुख त्या शूद्रांना सांगतात, शिक्षण घेतल्याने नीती, धर्म, शिकता येईल व शूद्र म्हणून लागलेला जो डाग आहे तो पुसता येईल.

मुलाबाळांना आपण शिकवू, आपणसुद्धा शिकू । विदया घेऊन ज्ञान वाढवून, नीतिधर्मही शिकू | नसानसातून ईर्षा खेळवू, विद्या मी घेईन || शूद्रत्वाचा डाग हा माझा, निपटून काढीन //

असे 'शिकण्यासाठी जागे व्हा' या कवितेत सावित्रीबाईंनी म्हटले आहे. 'मानव' असण्याची सावित्रीबाईंची जी संकल्पना होती, ती त्यांनी 'तयास मानव म्हणावे काय ? या कवितेत मांडली आहे. मानवामध्ये कोणते सद्गुण हवेत, ज्यामुळे त्याचे चारित्र्य चांगले राहील हे सांगताना त्या म्हणतात

दुसऱ्यास मदत नाही, सेवा, त्याग, दया, मायाही जयापाशी सद्गुण नाही, तयास मानव म्हणावे का? चारित्र्यसंपन्न, सद्गुणसंपन्न बनण्याचे साधन म्हणजे शिक्षण असे त्यांनी सांगितले.

या त्यांच्या शैक्षणिक सिद्धांताचा उपयोग त्यांनी आपल्या शैक्षणिक क्रांतीमध्ये केला. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची नोंद ब्रिटिश सरकारने घेतली.

१६ नोव्हेंबर, १८५२ या दिवशी म्हणजेच पहिली शाळा निघाल्यापासून चार वर्षाला दीड महिना कमी असतानाच ब्रिटिश सरकारने फुले दांपत्याला मानाचा मुजरा करण्यासाठी त्यांचा सत्कार केला. पुण्यात झालेला भारतीय समाज सुधारकांचा तो पहिला सत्कार होता, ही बाब येथे उल्लेखनीय आहे. सत्कार समारंभाला पुण्यातील विद्वान शास्त्री मंडळी, कलेक्टर, प्रोफेसर, ब्रिटिशांचे विविध खात्यांतील वरिष्ठ अधिकारी होते. मेजर कँडी यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी त्यांनी काढलेले उद्गार महत्त्वाचे आहेत. "मिशनरी पद्धतीने सावित्रीबाईंनी स्त्रियांची सेवा केली. विरोधकांचा विरोध होत होता, तरीही त्या मागे हटल्या नाहीत. त्यांच्या कार्याला भारतीय इतिहासात तोड नाही. सावित्रीबाईंनी स्त्री-शूद्रांची सेवा करून स्त्रियांना ज्ञानाची कवाडे उघडून दिली.' त्यांचे हे उद्गार त्यांच्या थोर कार्याची ग्वाही देणारे आहेत. 

हा सत्कार बुरसटलेल्या रूढी, परंपरांना फेकून देणाऱ्या पुरोगामी विचारांचा होता. हा सत्कार स्त्रीशक्तीचा होता. हा सत्कार ज्ञानरवीच्या प्रकाशाचा होता.

या इंग्रज सरकारच्या सत्कारासोबतच सरकारी अहवालातदेखील असे नमूद करण्यात आले, की 'स्त्रियांच्या शिक्षणात प्रगती व्हावी, यासाठी या कामाला पगाराचा विचार न करता, स्वतः होऊन निष्ठेने मुख्याध्यापिका सावित्रीबाईंनी वाहून घेतले. ज्ञानाची प्रगती होत जाईल, तसतसे स्त्रीशिक्षणाचे फायदे या देशातील लोकांना कळू लागतील. अंधश्रद्धा व अन्याय्य रूढींच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी योजलेल्या कार्यक्रमाला त्यांचे हार्दिक सहकार्य उपलब्ध होऊ लागेल, अशी आम्हांला आशा आहे.

सावित्रीबाईंचे एकूण कार्य लक्षात घेता, एक शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेविका म्हणून त्यांचे कार्य महान आहे. सावित्रीबाईंचा काळ पाहिला, तर हे लक्षात येते, की त्यांना शून्यातून विश्व उभे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. जमिनीवर असणाऱ्या स्त्रीला आकाशाला गवसणी घालण्याइतपत उच्च स्थानावर पोहोचविले. कर्मयोगिनी अशा त्या आदर्श शिक्षणतज्ज्ञ आहेत.

आभार 

(जीवन शिक्षण )

डॉ. किरण नागतोडे

सेवानिवृत्त: सहयोगी प्राध्यापिका स्वावलंबी शिक्षण महाविद्यालय, वर्धा.