Ghoshticha Guruvar Bhag 5
गोष्टींचा गुरूवार भाग- ५
पावनखिंड
गोष्टींचा गुरूवार या उपक्रमात प्रत्येक गुरूवारी आपणास एक गोष्ट दिली जाणार आहे. ती गोष्ट आपण ऐकू शकता. तीच गोष्ट आपण खालिल दिली असेल त्याचे वाचन सुध्दा करू शकता. प्रथम श्रवण करा नंतर ती वाचन करा. यामुळे वाचन कसे करावे हे तुम्ही शिकाल. त्यानंतर त्याचप्रमाणे वाचन करून वाचनाचा व श्रवणाचा सराव करू शकाल.
पावनखिंड
रणजित देसाई कथाकार आणि कादंबरीकार. यांची 'स्वामी' कादंबरी विशेष गाजली. पुढील पाठ हा त्यांच्या 'श्रीमान योगी' या कादंबरीतून घेतला आहे. श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात बाजीप्रभूने पावनखिंडीत कसे हौतात्म्य पत्करले याचे हृदयस्पर्शी वर्णन या पाठात आले आहे.
कथा
|
पावनखिंड |
लेखक
|
श्री
रणजित देसाई |
आभार
|
बालभारती
|
पुस्तक
|
इयत्ता
६ वी बालभारती |
वर्षे
|
प्रथम
आवृत्ती १९९४ |
|
|
पावनखिंड
राजे गडावरून निसटून गेल्याची खात्री होताच खानाच्या छावणीत गोंधळ उडाला. स्वतःचे कौतुक करून घेत बसलेला मसूद, आपण आणलेला शिवाजी खोटा शिवाजी आहे, हे कळताच हताश झाला. संतापाने त्याने पुन्हा फौज गोळा केली आणि मध्यरात्रीनंतर तो विशाळगडाच्या वाटेला लागला. सिद्दी जौहरला नक्की काही उमजत नव्हते. कदाचित खरा शिवाजी अजून गडावरच असेल, अशी शंका येऊन या गोंधळात विस्कळीत झालेला वेढा परत आवळून तो स्वतः गडाजवळच राहिला.
विशाळगडाच्या वाटेवर कुठेतरी पहाट होत होती. राजांची पालखी दौडीने पळवली जात होती. पालखीच्या पुढेमागे पळणारे वीर सारखी मागेपुढे नजर टाकत होते. वादळ कमी झाले होते; पण पाऊस होताच. राजे पालखीच्या गोंड्याला धरून पालखीत बसले होते. ऊर फुटेपर्यंत माणसे सारखी पळत होती. पालखीची माणसे पळता पळता बदलत होती. खालच्या चिखलातून पावलांचा अखंड नाद उमटत होता. आपल्यासाठी घेतले जाणारे कष्ट पाहून राजांचे डोळे बसल्याजागी भरून येत होते. विशाळगड अजून फार दूर होता.
दिवस दीड प्रहरावर आला आणि मागून येत असलेल्या मसूदची बातमी घेऊन हेर धावत आला. रात्रभर पळून थकलेल्या त्या जिवांचा थकवा ती बातमी ऐकताच कुठच्या कुठे गेला. जीव पणाला लावून विशाळगडाचे अंतर - कमी करण्यासाठी सारे घावू लागले. विशाळगड अजूनही फार लांब होता. सर्वस्व पणाला लावून पालखीने गजापूरची खिंड गाठली.
खिंडीपासून गडाचे अंतर अजून तीन कोसांचे होते. मागून येत असलेला शत्रू तर दृष्टिपथात आला होता. दीड हजारांचे दळ घेऊन मसूद त्वेषाने चालून येत होता. गजापूरच्या पोडखिंडीजवळ राजे आले आणि त्यांना बातमी लागली विशाळगडाला सुर्वे आणि जसवंतसिंग वेढा देऊन बसले - आहेत. गडावर पोहोचायचे झालेच, तर सुव्यांचा वेढा फोडूनच वर जायला हवे होते. मागून मसूद येत होता. वेढा फोडायचा कुणी?
राजांच्याबरोबर सहाशेच्या आसपास पायदळ, भोई वगैरेची संख्या धरली, तरी आठशेच्या आतच माणूसबळ रात्रभर चिखलराडीतून पंधरा कोस धावलेले, छाती फुटेपर्यंत पळालेले. ही माणसे आता ताज्या दमाच्या सुर्व्यांची फळी फोडणार होती. संतापाने बेभान झालेल्या मसूदला टक्कर देणार होती..
कधीही बधिर न होणारी राजांची विचारशक्ती सुन्न झाली. बाजीप्रभूंनी पालखी खाली ठेवण्याची आज्ञा केली. गजापूरच्या खिंडीत पालखी खाली ठेवली गेली. राजे बाहेर आले. बाजी म्हणाले, "महाराज, आता वेळ करू नका. निम्मी शिबंदी घेऊन तुम्ही पुढं व्हा सुर्व्यांची फळी फोडून तुम्ही गड गाठा."
"आणि बाजी, तुम्ही?"
"मी येथे उभा राहतो! केवढाही वेळ लागो. शत्रूला खिंड ओलांडू देत नाही!" "नाही, बाजी! जिवाची बाजी लावून आम्हांला इथवर आणलंत. आता जे होईल ते मिळून करू." "राजे!" बाजी म्हणाले, "प्रत्येक क्षण मोलाचा आहे. कृपा करून तुम्ही पुढे जा. जिवाची बाजी लावून तुम्हांला येथे आणले, ते यासाठी नव्हे! या कष्टांचं चीज करा. गनीम येतो आहे. दावा साधील. सारं क्षणात व्यर्थ होईल. " राजांनी बाजींना मिठी मारली. बाजी मुजरा करत म्हणाले,
"राजे, तुम्ही या. मुला लेकरांना अन्न दयायला तुम्ही समर्थ असता, मला काळजी कसली? पण राजे..."
"काय, बाजी?" राजे अश्रू आवरत विचारते झाले.
"राजे, गडावर जाताच इशारतीची तोफ दया. बस्स! या, राजेऽऽ"
राजांनी बाजींना परत मिठी मारली. क्षणभर बाजीही त्या मिठीत विसावले. दुसऱ्याच क्षणी मिठी सोडवत बाजी बाजूला झाले. राजे आपल्या शिबंदीसह गडाकडे जाऊ लागले. राजे दिसेनासे होताच बाजी त्वेषाने मागे फिरले. सारे बांदल बाजींकडे पाहत होते.
"पाहता काय? राजे गडावर जाईपर्यंत एकही गनीम या खिंडीतून जाता कामा नये. राजांना गडावर पोहोचवायची जबाबदारी आपली आहे. बोला,
हरऽऽहऽऽ महाऽऽदेव !"
'हर हर महादेव'ची एकच गर्जना उसळली. पायांत त्राण आले. तलवारी उपसल्या गेल्या. बाजीप्रभू घोडखिंडीत उभे ठाकले. “दीन, दीन!" म्हणत मसूद चालून येत होता.
गजापूरच्या घाटीवर असलेली घोडखिंड आपले नाव सार्थ करणारी होती. दोन्ही बाजूंना उंच दरड होती. मध्ये अरुंद वाट होती. खिंड जवळजवळ दीडशे कदम लांब होती.
मसूदचे सैन्य खिंडीपाशी आले आणि बाजीप्रभूंचे बांदल मावळे त्वेषाने तुटून पडले. एकच कापाकापी सुरू झाली. मसूदचे सैन्य हटले. बाजीप्रभूंचे आघाडीचे मावळे मागे हटले. पाठीमागचे पुढे सरकले. थोड्या थोड्या अवधीने मसूदचे सैन्य हल्ला करत होते. बाजींचे सैन्य प्रतिकार करत होते. यात प्रहर उलटला.
राजे आपल्या तीनशे मावळ्यांसह गडाकडे धावत होते. गड नजरेत आला होता. तोच सुर्व्याच्या वेढ्याला खबर मिळाली-खुद्द शिवाजीराजे चालून येत आहेत.
सुर्वे राजांवर चाल करून आले. राजांच्या लोकांनी पराक्रमाची शर्थ केली. राजांसह सारे लढत होते. हळूहळू सुव्यांचा विरोध कमी होऊ लागला. त्यांचे सैन्य हटू लागले. हीच संधी घेऊन 'हरहर महादेव'ची गर्जना गडापर्यंत पोहोचली. सुयांचा वेढा कापून राजे आपल्या जखमी मावळ्यांसह विशाळगडाकडे धावू लागले.
गडावर भगवा झेंडा फडकत होता. क्षणाक्षणाला किल्ला जवळ येत होता. प्रत्येक मावळ्याला आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते.
राजे सुटले होते. पण बाजी पुरे अडकले होते. बाजींची तीनशेंची फौज आता निम्मीही राहिली नव्हती. ज्याला जखम नाही, असा मावळा दिसत नव्हता.
बाजी रक्तबंबाळ झाले होते. पागोटे केव्हाच पडले होते. बलदंड शरीराचे बाजी शत्रूवर त्वेषाने फिरंग चालवत होते. डोईच्या संजाबातून मानेवर शेंडीचा झुबका रुळत होता. बाजींच्या अंगी वीरश्री संचारली होती. तीन प्रहर होत आले तरी खिंड काबीज होत नव्हती. दरड चढण्याचा प्रयत्न केला तरी त्यात यश येत नव्हते. मसूद संतापला होता, पण त्याचे काही चालत नव्हते. लढाईचे असे रूप त्याने आजवर पाहिले नव्हते. आतापर्यंत खिंडीवर तुटून पडणारे लोक खिंड जवळ येताच, बचावाचे धोरण घरत, दबकत पुढे सरकत होते. बाजींनी आता विटा हाती घेतला होता. खिंडीपासून काही अंतरावर विटा गनिमाचा वेध अचूक घेत होता. खिंडीच्या दारात अजिंक्य आत्म्यांचे कडे उभे ठाकल्याचा भास होत होता.
मसूदने बंदूक आणायला फर्मावले. बंदूक आणली
गेली. नेमबाजाने नेम घरला आणि बार झाला. गोळी छाताडाला लागली. बाजी त्या धक्क्याने
मागे कोसळले. बाजींना मागे आणले गेले. मावळे पुढे सरकले. खिंड परत अजिंक्यच
राहिली.
बाजी शुद्धीवर आले. वर धुरकट आकाश दिसत होते. त्यांनी विचारले,
"तोफ झाली?" नकारार्थी माना हालल्या. बाजी उठू लागले, जखमांनी माखलेल्या, वर्मी झालेल्या घावाने घायाळ बनलेल्या बाजींना कुणीतरी म्हणाले,
"बाजी ! तुम्ही उठू नको. आम्ही खिंड राखतो."
"तोफ झाली नाही?" म्हणत सारे बळ एकवटून बाजी उठले. त्यांनी माणसांना बाजूला सारले. धडपडत हातातल्या विट्यावर तोल सावरीत बाजी झोकांड्या देत गर्जले,
"गोळी लागली, म्हणून काय झाले? राजे गडावर पोहोचले नाहीत, आणि बाजी मरतो...?" बाजी वाट काढीत खिंडीच्या प्रवेशद्वाराशी गेले. बाजींनी विटा हाती पेलला. रक्तबंबाळ बाजी समोर दिसताच पुढे येणारे गनीम मागे हटले. तोच
गडावरून तोफेचा आवाज आसमंतात कडाडला.
बाजींच्या चेहऱ्यावर हसू उमटले. बाजी पुटपुटले,
"राजे गडावर पोहोचले. आपली फत्ते झाली!"
1 Comments
Super voice...very very nice
ReplyDelete