Ghoshticha Guruvar Bhag 5
गोष्टींचा गुरूवार भाग- ५
पोपटपंची
गोष्टींचा गुरूवार या उपक्रमात प्रत्येक गुरूवारी आपणास एक गोष्ट दिली जाणार आहे. ती गोष्ट आपण ऐकू शकता. तीच गोष्ट आपण खालिल दिली असेल त्याचे वाचन सुध्दा करू शकता. प्रथम श्रवण करा नंतर ती वाचन करा. यामुळे वाचन कसे करावे हे तुम्ही शिकाल. त्यानंतर त्याचप्रमाणे वाचन करून वाचनाचा व श्रवणाचा सराव करू शकाल.
पोपटपंची
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. एकदा एक साधू आपल्या कुटीत ध्यान-धारणा करत होते. तेथे अचानक एक पोपट भयभीत होऊन आला आणि साधूंच्या मांडीवर येऊन बसला. थोड्या वेळाने साधूमहाराजांनी डोळे उघडून पाहिले, तर मांडीवर पोपट बसलेला ! पोपट भीतीने थरथर कापत होता. शिकाऱ्याच्या तावडीतून कसाबसा सुटून तो साधूंपर्यंत येऊन पोचला होता. साधूंनी त्याला अभय दिले. ते त्याची फार काळजी घेऊ लागले. गोड गोड फळे त्याला खायला देऊ लागले; पण त्यांना पोपटाची नेहमी चिंता वाटे, की हा जंगलात गेला आणि पूर्वीसारखाच एखादया शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडला तर !
साधूमहाराजांनी पोपटाला बोलायला शिकवले. मधुर भाषणाने पोपट साधूंची करमणूक करू लागला. साधूंनी पोपटाला एक धडा पाठ करायला लावला. तो धडा असा होता "जंगलात शिकारी येतात, जाळे टाकतात, दाण्याची लालूच दाखवतात आणि आपल्याला जाळ्यात अडकवतात. आपण सावध राहिले पाहिजे !' पोपट सगळा धडा बिनचूक म्हणू लागला. पुढे पुढे पोपटाने बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले, दिवसभर तो एकच धडा घोकू लागला. स्वतःच्या बचावाचा धडा त्याने लक्षात ठेवला; म्हणून साधूंना बरे वाटे.
एकदा त्यांनी पोपटाची परीक्षा पाहायचे
ठरवले. प्रत्यक्ष प्रसंग पडल्यावर पोपटाला घोकलेल्या धड्याची आठवण राहील का ?
तो सावधगिरीने वागून स्वतःची सुटका करील का ? की
या धड्याची केवळ पोपटपंचीच करील ? हे साधूंना पाहायचे होते.
साधू पोपटाला जंगलात सोडून आले. काही
दिवसांनी साधू परत जंगलात गेले. हिंडता-हिंडता त्यांना तो पोपट दिसला. 'जंगलात शिकारी येतात. जाळे टाकतात, दाण्याची लालूच
दाखवतात आणि आपल्याला जाळ्यात अडकवतात. आपण सावध राहिले पाहिजे!' हा पाठ तो घोकत होता. साधूंना हे ऐकून आनंद झाला. पोपटास धडा पाठ होता,
इतकेच नाही तर जंगलातील सगळ्याच पोपटांनी तो धडा पाठ केला होता.
एवढ्यात साधूंना जंगलात एक शिकारी दिसला.
त्यांनी त्याला विचारले, "दिवसात तुझी कमाई
किती ?" शिकारी म्हणाला, "पाच
रुपये." साधूंनी शिकाऱ्याला पाच रुपये दिले आणि म्हणाले,
"त्या झाडाकडे जा आणि जाळे टाकून बघ, किती
पोपट जाळ्यात सापडतात ते. जेवढे सापडतील, तेवढे मला दे."
शिकारी कबूल झाला. पोपटांच्या दिशेने जाताजाता शिकाऱ्याला पोपटांची
घोकंपट्टी ऐकू आली. त्याला आश्चर्य वाटले, 'मी शिकारी आहे,
जाळे टाकणार, दाणे फेकणार आणि त्यांना जाळ्यात
पकडणार हे पोपटांना 'कसं कळलं ? त्यांनी
मला कसं ओळखलं ? आता हे पोपट आपल्या जाळ्यात कसले सापडणार !'
असे वाटून शिकारी साधूंकडे परत गेला.
साधू म्हणाले,
"असं निराश होऊ नकोस. पोपटांची परीक्षा बघण्याकरताच तुला मी
पाठवलं होतं. तोंडानं बोलतात त्या शब्दांचा अर्थ त्यांना समजतो का, त्याप्रमाणे सावधगिरीनं ते आचरण करतात का, हेच मला
बघायचं आहे. तू पुन्हा जाऊन जाळं टाक.'
शिकाऱ्याने जाऊन पुन्हा जाळे पसरले,
दाणे टाकले आणि बाजूला जाऊन बसला. थोड्या वेळाने जंगलातले पोपट दाणे
खायला उतरले आणि जाळ्यात अडकले. त्यांत साधूंचा पोपटसुद्धा होता ! साधूंना हे
पाहून वाईट वाटले. ते पोपटाजवळ गेले आणि म्हणाले, "बाबा
रे, मी तुला एवढा उपदेश केला, तो तू
विसरलास कसा ?"
पोपट म्हणाला,
"महाराज, मी तुमचा उपदेश विसरलो नाही.
सगळा तोंडपाठ आहे. ऐका."
तेव्हा साधू म्हणाले,
"अरे वेड्या, नुसता घोकण्यासाठी मी तुला
तो उपदेश केला नव्हता. त्याप्रमाणे वागून स्वतःचा जीव तुला वाचवता यावा; म्हणून केला होता !" हे ऐकून पोपटाला धड्याचा खरा
अर्थ समजला. त्याने साधूंची क्षमा मागितली. "यापुढे
नुसती पोपटपंची करणार नाही. अर्थ समजून घेईन व त्याप्रमाणे वागेन," असे त्याने साधूंना वचन दिले.
0 Comments